
बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात मोठे उद्योग यायला हवे. या मोठय़ा उद्योगाच्या बळावर इतर सूक्ष्म व लघुउद्योगांना चालना मिळायला हवी. असे झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल, असे मत बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे (बीएमए) अध्यक्ष नितीन लोणकर यांनी व्यक्त केले. आज शुक्रवारी लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.
लोणकर म्हणाले, आशियातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत बुटीबोरी येथे आहे. भविष्यात होणारी गुंतवणूक बघता येथे सुमारे १६०० हेक्टरची अतिरिक्त जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीही हवे तसे मोठे उद्योग नागपुरात येताना दिसत नाही. अनेक उद्योजकांचा असा समज आहे की नागपुरात कामगारांची काम करण्याची प्रवृत्ती कमी आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती उद्योजकांना वाटत असते. वास्तविक येथील विकास मोठे उद्योग न येण्यामुळेच खुंटला आहे.
बुटीबोरी एमआयडीसीला ऑटोमोबाईल उद्योगाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऑटोमोबाईल उद्योग आल्यास त्याच्याशी निगडित छोटय़ा उद्योजकांना काम मिळू शकते तसेच या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकतात. आज ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करण्यासाठी स्थानिकांना शहर सोडून पुणे, मुंबईकडे जावे लागत आहे. हीच नेमकी बाब लक्षात घेऊन आम्ही खासदार कृपाल तुमाने यांच्या मदतीने केंद्रीय जड उद्योग मंत्री अनंत गीते यांची भेट घेऊन नागपुरात मोठे उद्योग यावे यासाठी प्रस्ताव दिला. तेव्हा गीते यांनी टीव्हीएस मोटारसायकल कंपनी नवा प्लॉन्ट टाकण्यासाठी जागा शोधत असल्याचे सांगितले. आम्ही नागपूरचा पर्याय त्यांच्या समोर ठेवला. मात्र, पुढे त्याला फारसे यश आले नाही. तसेच वेदांत समूह एलजी कंपनीचा एलसीडी टीव्हीचा मोठा उद्योग अॅडिशनल बुटीबोरीत उभारणार होता. त्यांना ३०० एकर जागा देण्याचे खात्री पत्रही एमआयडीसीकडून देण्यात आले. मात्र, हा प्रस्तावही थंडबस्त्यात गेला. तो जर आला असता तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात मोठे यश लाभले असते. जवळपास १६ हजार कोटींचा तो उद्योग होता. बुटीबोरी एमआयडीसीमध्ये सध्या ६० टक्के स्थानिक तर ४० टक्के बाहेरचे उद्योजक आहेत. विशेष म्हणजे, बजाज ग्रुपचे मूळ वर्धेचे आहे. त्यामुळे त्यांनी येथे मोठा उद्योग सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी इतर ठिकाणाला पसंती दर्शवली. बुटीबोरी पंचतारांकित परिसर १६०० हेक्टरमध्ये आहे.
तसेच बुटीबोरी औद्योगिक परिसरात ३०० हेक्टरमध्ये तर विस्तारित परिसर १८०० हेक्टरचा आहे. सध्या बुटीबोरीत साडेसातशे उद्योग आहेत. यामध्ये जवळपास ५० हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. ज्यामध्ये ५० टक्के वाटा स्थानिकांचा आहे. बुटीबोरीत प्रामुख्याने टेक्सटाईल आणि इंजिनिअरिंग उद्योग जास्त आहेत. भारतात ट्रान्समिशन लाईन्स टॉवरच्या उत्पादनापकी २५ टक्के उत्पादन आपल्या भागात होते. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात मोठे नामांकित उद्योग यावे, यासाठी बीएमएचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, याकडेही लोणकर यांनी लक्ष वेधले.
५९ मिनिटात कर्जाचा लाभ घ्या
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने केवळ ५९ मिनिटात १० लाखपासून ते एक कोटी रुपयापर्यंतचे कर्ज मंजूर करण्याची योजना सुरू केली आहे. देशातील ८० जिल्ह्य़ात ही योजना लागू झाली असून यामध्ये नागपूर जिल्ह्य़ाचाही समावेश आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा नागपूरच्या सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन लोणकर यांनी केले.
सवलतीच्या दरात वीज मिळायला हवी
उद्योग क्षेत्राला देण्यात येणाऱ्या विजेचे दर बघितले तर इतर राज्याच्या तुलनेत आपल्याकडे ते जास्त आहेत. शेजारी तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेशात सवलतीच्या दरात उद्योगाला वीजपुरवठा होतो. आपल्यालाही वीजपुरवठा सवलतीच्या दरात मिळाला तर नक्कीच येथे नवीन उद्योग आकर्षति होतील. विशेष म्हणजे, नागपूर देशाच्या मध्यस्थानी असल्याने आणि एक राष्ट्र एक कर असल्याने देशाच्या कोणत्याही ठिकाणी माल पाठवण्याच्या दृष्टीने लॉजिस्टिकसाठी बुटीबोरी महत्त्वाचे ठिकाण झाले आहे.
राजकीय पाठबळाची आवश्यकता
गुंतवणूक आणण्यासाठी राजकीय पाठबळाची गरज असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात नवे उद्योग आण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्याला यशही मिळाले. गेल्या चार वर्षांचा विचार केला तर दोन मोठे उद्योग बुटीबोरी एमआयडीसीमध्ये आले. यामध्ये सीएट टायर्स आणि साज फूड (बिस्क फार्म)चा समावेश आहे. तसेच जवळपास ५० छोटे-मोठे उद्योगही आले आहेत. आम्ही देखील शासनाला सहकार्य करत असून नवे उद्योग आण्यासाठी प्रयत्नरत आहोत.