देशात उद्योजकांना अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचा सकारात्मक लाभ घेत आपल्या आणि देशाच्या औद्योगिक प्रगतीत सहभाग नोंदवावा. त्यातून व्यवसायाचा विस्तार होण्याबरोबर आपण देशाप्रती काम करत असल्याची भावना जागृत होते, असे प्रतिपादन लघुउद्योग भारतीचे राष्ट्रीय महामंत्री गोविंदराव लेले यांनी आज येथे केले.
लघुउद्योग भारतीचे जिल्हास्तरीय अधिवेशन आज येथे दाते रिजन्सीत झाले. गरवारे उद्योग समूहाचे माजी संचालक अनिल भालेराव अध्यक्षस्थानी होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र वैद्य, जालन्याच्या विनोदराय अँड कंपनीचे संचालक सुनील रायथत्ता, एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे तज्ज्ञ प्रशिक्षित रोहित मिश्रा, कर आणि उद्योग सल्लागार जी. बी. मोदी उपस्थित होते. त्यावेळी श्री. लेले बोलत होते. अधिवेशनात उद्योग क्षेत्रातील सामाजिक दायित्व, लघुउद्योग भारतीचे कार्य आणि भूमिका, उत्पादन निर्मिती आणि अमर्याद निर्यात संधी, गुंतवणूक मारदर्शन, राज्याचे नवीन औद्योगिक धोरण या विषयावर मंथन झाले.
श्री. लेले म्हणाले, की कोणतीही घटना संधी म्हणून स्वीकारावी. राज्याचे उद्योग धोरण सकारात्मक आहे. त्याचा उपयोग करावा. लघुउद्योग भारतीचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूरला ऑगस्टमध्ये होईल, त्यात उपस्थित राहावे.
लघुउद्योग भारतीच्या मालेगाव शाखेची स्थापना केली. तीत दिनेश लोढा यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. अधिवेशनाला उद्योग क्षेत्रातील मान्यवर लखण भतवाल, रवी बेलपाठक, साहेबचंद जैन, संजय चौधरी, राजेश पाटील, कैलास अग्रवाल, मनोज अग्रवाल, आकेश अग्रवाल, अजय चांडक, निमीत कटिरा, राजेश गिंदोडिया, सी. ए. संघटनेचे अध्यक्ष राजाराम कुलकर्णी उपस्थित होते.
उपाध्यक्ष राजेंद्र जाखडी, महेश नावरकर, कोशाध्यक्ष बापू बडगुजर, सचिव राहुल कुलकर्णी, सहसचिव वर्धमान सिंघवी व संचालकांनी संयोजन केले. लघुउद्योग भारतीचे जिल्हाध्यक्ष सुभाष कांकरीया यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष राजेंद्र जाखडी यांनी सूत्रसंचालन केले. राहुल कुलकर्णी यांनी आभार मानले.
धुळ्यातील उद्योजकांचा सत्कार
लघुउद्योग भारतीच्या कार्यात सहभागी असलेले उद्योजक राजेश भतवाल, राजेश वाणी, प्रकाश बागूल, संजय बागूल, सुभाष कांकरीया, राजेंद्र जाखडी, प्रशांत मोराणकर, नितिन बंग आदींचा सन्मान करण्यात आला.