धामणकरांचा आदर्श ब्रेड हा नाशिकच्या प्रत्येक नागरिकाला परिचित आहे. धामणकर कुटुंबीयांपैकी सर्वांत मोठे असलेले श्रीराम सदाशिव धामणकर रेल्वेत नोकरीला होते. रेल्वेतील वातावरण न पटल्याने त्यांनी नाशिकमध्ये हिंद एजन्सी या नावाने ‘फिक्स रेट’ असलेले कापडाचे दुकान सुरू केले. काही दिवसांनंतर सरकारने कापडाच्या व्यवसायावर नियंत्रण आणल्याने त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर नाशिकरोड जेलमध्ये तयार होत असलेला बेकरीचा माल विकण्यास धामणकरांनी सुरुवात केली. या मालाबाबत तक्रारी वाढल्याने त्यांनी हा माल विकणे बंद केले आणि स्वत: बेकरीचा माल उत्पादित करून विकण्याचे ठरविले. उत्पादनाचे ज्ञान नसल्याने पुण्याच्या हिंदुस्तान बेकरीत काम करून त्यांनी ज्ञान अवगत केले. नाशिकमध्ये येऊन त्यांनी उत्पादनाला सुरुवात केली. आपण शिकून आलेले बेकरी व्यवसायातील कसब त्यांनी बंधू श्रीकृष्ण, बहीण कृष्णा, गंगू, सिधू यांनाही शिकविले. सचोटीने व्यवसाय हा त्यांचा बाणा होता. आपण ग्राहकाकडून पैसे घेतो त्याचा योग्य मोबदला त्याला दिलाच पाहिजे, या हेतूने त्यांनी मालात कधीही तडजोड केली नाही. २००४ मध्ये हा व्यवसाय एका उंचीवर पोहोचल्यावर त्यांनी तो बंद करण्याचा निर्णय घेतला.
अनेक संस्थांना देणगी
अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करीत असल्याने नाशिककरांनी भरभऱून प्रेम दिले. या प्रेमाचे उतराई व्हावे यासाठी त्यांनी अनेक संस्थांना मदतीचा हात दिला. पुणे विद्यार्थिगृहाला त्यांनी एक कोटी रुपयाची देणगी दिली. या देणगीतून श्रीराम धामणकर सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कॉलेजची उभारणी करण्यात आली. दुसरे बंधू श्रीकृष्ण धामणकर यांच्या नावाने एमबीएचे कॉलेज सुरू केले. धामणकर बंधू-भगिनींचे शिक्षण नाशिक शिक्षण प्रसाराक मंडळाच्या रुंगटा हायस्कूलमध्ये झाले होते. या संस्थेच्या ऋणातून उतराई व्हावे म्हणून त्यांनी या संस्थेला एक कोटींची देणगी देऊन सभागृह बांधण्यास मदत केली. गंगापूररोडवर असलेले श्री गुरुजी रुग्णालय, बालाजी मंदिर, गायत्री मंदिर अशा अनेक संस्था, मंदिरांना या कुटुंबाने देणग्या दिल्या आहेत. शहरात अशा अनेक संस्था आहेत, ज्यांना धामणकर कुटुंबीयांनी मोलाचा आधार दिला आहे.
आम्ही काही श्रीमंत नाही. जो व्यवसाय केला तो सचोटीने केला. त्यातून आलेल्या रकमेतून नाशिककरांचे ऋण फेडावे या भावनेने आम्ही संस्थांना देणगी दिली. आम्ही कठीण परिस्थितीतून आलो आहोत. त्यामुळे खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे – गंगू धामणकर, ज्येष्ठ सदस्य, धामणकर परिवार