
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘श्वेत क्रांती’नंतर देशात ‘मधुर क्रांती’ घडविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘राष्ट्रीय मध मोहिमे’च्या (हनी मिशन) दुसऱ्या टप्प्यात शेतकरी व बेरोजगार युवकांना ८५ हजार मधमाशी पेट्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे देण्यात आली. पुणे विभागातही मधमाशी पालनाबाबत जागृती वाढत असून, या वर्षी ११० जणांना ११०० मधमाशी पेट्या वितरित करण्यात आल्याचेही केंद्रातर्फे सांगण्यात आले.
बेरोजगारांच्या हाताला काम व मधमाशांच्या परागीभवनातून पीक उत्पादकता वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या हेतूने केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय मध मोहीम’ हाती घेतली आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगातर्फे ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत शेतकरी व बेरोजगार युवकांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण व अनुदानित किंमतीत मधमाशी पेट्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. देशात ‘मधुर क्रांती’ घडवून आणण्याचे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६मध्ये सुरू केलेल्या या मोहिमेत आतापर्यंत एक लाखाहून अधिक मधमाशी पेट्यांचे वितरण करण्यात आले आहे.
आता या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू असून त्यामध्ये वर्षभरात ८५ हजार मधमाशी पेट्यांचे (बी कॉलनीज) वाटप करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या सहायक संचालक डॉ. लक्ष्मी राव यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. दहा ‘बी बॉक्सेस’ आणि मधमाशी पालनाच्या साहित्याचा समावेश असलेल्या या पेट्यांची किंमत ४० हजार रुपये आहे. त्यावर सरकारतर्फे अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांना ९० टक्के, तर सर्वसाधारण प्रवर्गातील नागरिकांना ८० टक्के अनुदान दिले जाते. त्यानुसार, पुणे विभागात वर्षभरात ११० जणांना अनुदानित तत्त्वावर मधपेट्या देण्यात आल्या आहेत. या पेट्यांच्या वितरणापूर्वी मधमाशांचे प्रकार, मध व पराग काढण्याची प्रक्रिया, मधमाशांचे स्थलांतर याची प्रात्यक्षिकांसह माहिती देणाऱ्या कार्यशाळा आयोजित केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढील वर्षी या मोहिमेअंतर्गत मधपेट्या वितरित केलेल्या नागरिकांचा ‘स्व-मदत गट’ तयार करण्यात येणार असून, त्यांना मेणपत्र, मधयंत्र, मध साठविण्याचा डबा, मधमाशांचे विष काढण्याचे साहित्य दिले जाणार आहे. याशिवाय मधमाशा फुलांतील परागकण (पोलेन) गोळा करतात. त्याला बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यासाठीचे साहित्यही मधमाशी पालकांना देण्याचा प्रस्ताव केंद्राने खादी व ग्रामोद्योग आयोगाकडे दिल्याचेही डॉ. लक्ष्मी राव यांनी सांगितले.
……
उद्योजक घडविण्यावरही भर
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत ‘पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजना राबविण्यात येत आहे. त्या द्वारे बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार विकसित करण्यासाठी १० लाखापासून २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यावर केंद्र सरकारतर्फे शहरी भागात २५ टक्के, तर ग्रामीण भागात ३५ टक्के अनुदान दिले जाते. त्या अंतर्गत मधमाशी पालन उद्योजक घडविण्यासाठी केंद्रातर्फे १०० मधमाशी पेट्यांचे वाटप केले जाणार असल्याचेही डॉ. लक्ष्मी राव यांनी सांगितले.