मागील मंगळवारी जोरदार वादळाने चहाच्या टपऱ्या पत्र्यासारख्या हवेत उंच उडाल्या. अवधान एमआयडीसीत वादळाने इतके थैमान घातले की कंपनी मालकांना नेमके काय करायचे, हेच सूचत नाही. ४० कंपन्यांना वादळाची जाेरदार झळ बसली. या कंपन्यांमधील माल उघड्यावर पडून आहे. नुकसान हाेण्यासारख्या मालाची बुधवारी इतरत्र वाहतूक करण्याचे काम सुरू हाेते. वीजखांब रस्त्यांवर पडून हाेते. झाडांची दैनावस्था तशीच हाेती. प्रशासनाची काेणतीच यंत्रणा कामी येत नसल्याची हलबलताही कंपनी चालकांनी वर्तविली. शहरानजीक असलेल्या अवधान येथील एमअायडीसीला पावसाळीपूर्व वादळाचा मंगळवारी जाेरदार तडाखा बसला. पहिल्यांदाच इतक्या भीषण स्वरूपाचे वादळ अाले अन् त्याने कंपन्यांना उघडेबाेडके करून ठेवले, अशा व्यथा बुधवारी कंपनी चालकांनी वर्तवल्या. एमआयडीसीत फेरफटका मारला तेव्हा वादळाने काय दैनावस्था केलीय, हे पाहायला मिळाले. कंपन्यांवरील पत्रे उडाल्याने काही कंपन्यांचा माल उघड्यावर आला. तर काही कंपन्यांमध्ये दिवसभर दुरुस्तीची कामे सुरू हाेती. मालाची इकडेतिकडे हलवाहलव सुरू हाेती. नुकसान हाेणारा माल पाऊस येण्यापूर्वी हलवला जात हाेता. या वेळी कंपनीच्या मालकांसह तेथील काही कामगारांनी सांगितले की, मंगळवारी आलेल्या जाेरदार वादळाने छतावरील हूक व एंगलमधून पत्रे निघून ते हवेत भिरकावले जात होते. काही रस्त्यावर तर काही विजेच्या तारांमध्ये अडकून पडले. वादळामुळे आलेली धूळ व पत्र्याच्या व कंपन्यांमधील वस्तूंच्या आवाजाने कर्मचारीही भयभीत झाले. विजेचे खांब वाकून खाली पडले. तसेच एका कंपनीच्या संरक्षण भिंतीचा भाग कोसळला. या वादळााने उद्योजक हताश झाले आहेत.
चहाच्या टपऱ्या हवेत खेळण्याप्रमाणे दोन ते तीन पलट्या मारून लांब अंतरावर उलटल्या. छोट्या मोठ्या हॉटेलचे प्लास्टिक कापड उडून गेले. काहींच्या काचा फुटल्या आहेत. तर अनेक ठिकाणी मोठे वृक्ष पूर्णपणे काेलमडले होते. काहींच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या होत्या. उशिरापर्यंत हे वादळाचे थैमान सुरू होते. त्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधार होता. तर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी अर्धवट लटकलेली पत्रे हवेने जोरजोरात आदळून आवाज करीत होती. अद्याप मोठ्या कंपन्यांमध्ये ते हटवण्याचे काम सुरू झालेले नाही. मात्र काही छोट्या कंपन्यांनी खराब पत्रे काढून त्या जागेवर तत्काळ नवीन पत्रे लावून काम सुरू केले. कारण पुन्हा पाऊस झाल्यास आतील मालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. वसाहतीत डिसान एग्रो, संजय सोया, आर.एम. केमिकल्स, सुदर्शन केमिकल्स व खासगी गोडाऊन यांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. पत्रे उडाल्याने कंपनीचा तो भाग पूर्णपणे उघडा पडला आहे. पत्रेनिघाल्याने ते हवेने हलत असून आवाज करीत आहे. एका पाण्याच्या टाक्या बनवणाऱ्या कंपनीत तर पाण्याच्या टाक्या खेळण्यातील वस्तूप्रमाणे उडत असल्याचे चित्र होते. तासाभराच्या वादळाने औद्याेगिक वसाहतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वसाहतीत फिरताना वादळाची भीषणता लक्षात येते. हवामान विभागाकडून जर वादळाची सूचना प्रशासनाला मिळाली असती तर वसाहतीमधील उद्योजकांनी काळजी घेतली असती व नुकसान कमी झाले असते.
Source: Link