हरित लवादाने अनेक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना त्यांचे उत्पादन बंद करण्याचे वेळोवेळी आदेश दिले आहेत.
देशामध्ये प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये (क्लस्टर) तारापूर अग्रक्रमावर असून राज्यातील इतर औद्योगिक परिसरांची पर्यावरण रक्षणाची कामगिरी तुलनात्मक समाधानकारक आहे. राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषण करणाऱ्या १०० प्रमुख औद्योगिक शहरांची यादी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये राज्यातील चंद्रपूर, औरंगाबाद, डोंबिवली, नाशिक, नवी मुंबई, चेंबूर व इतर ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.
२०१८ मध्ये दाखल केलेल्या एका याचिकेची सुनावणी करताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील औद्योगिक क्षेत्रांना त्यांच्या प्रदूषण करण्याच्या पातळीवर क्रमांकवारी जाहीर केली आहे. (कॉम्प्रेहेन्सिव एन्व्हायर्न्मेंट पॉल्युशन इंडेक्स) सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांकाच्या आधारित ही क्रमवारी ठरवण्यात आली असून तारापूरमधील प्रदूषणाचा निर्देशांक ९३.६९ इतका सर्वाधिक नोंदवण्यात आला आहे.
प्रदूषणकर्त्यां औद्योगिक क्षेत्रांसाठी कृती योजना तयार करण्यासोबत या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या प्रदूषणावर रोख लावण्यासाठी हरित लवादाने संबंधित शासकीय विभागांना सक्त सूचना दिल्या आहेत. प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करून त्यांच्यामार्फत झालेल्या पर्यावरणाच्या नुकसानीचा आर्थिक मोबदला अशा उद्योगांकडून वसूल करण्याच्या निर्देश देण्यात आले आहेत.
हरित लवादाने अनेक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना त्यांचे उत्पादन बंद करण्याचे वेळोवेळी आदेश दिले आहेत. सांडपाण्यावर असमाधानकारक प्रक्रिया करणाऱ्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच क्षेत्रातील उद्योगांवर बंदीची कारवाईही केली आहे. जलप्रदूषण करणाऱ्या सर्व उद्योगांची सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला जोडणी असावी तसेच वायू, जल प्रदूषण नियंत्रण तसेच घातक घनकचरा संदर्भातील सर्व कायद्यांचे पालन काटेकोरपणे व्हावे असे १० जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान दिलेल्या हरित लवादाच्या निर्णयात म्हटले आहे.
हरित लवादाने केंद्रीय वन व पर्यावरण विभागाला या शंभर औद्योगिक क्षेत्रांमधील प्रदूषणाची स्थिती सुधारण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत.
प्रदूषण निर्देशांक
केंद्रीय व राज्य स्तरीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय परीक्षण समिती यांच्या माध्यमातून औद्योगिक परिसरांमध्ये असलेल्या प्रदूषणकारी घटकांचे गुणधर्म, प्रदूषणामुळे प्रभावित होणाऱ्या नागरिकांची संख्या तसेच उच्च धोका घटकांचा समावेश यांच्या धर्तीवर प्रदूषण निर्देशांक ठरवण्यात येतो.
हा निर्देशांक ७० हून अधिक असल्यास त्या औद्योगिक क्षेत्राला ‘गंभीर प्रदूषित क्षेत्र’, ६० ते ७० निर्देशांक असलेल्या क्षेत्रांना ‘तीव्र प्रदूषित क्षेत्र’ असे संबोधले जाते. प्रदूषणकारी क्षेत्रांमध्ये गुजरात राज्यातील अंकलेश्वर १६व्या क्रमांकांवर, वापी १८ आणि सुरत २६ व्या क्रमांकावर आहे.
* तारापूरमधील प्रदूषणाचा निर्देशांक ९३.६९
* पहिल्या पाच औद्योगिक क्षेत्रांत दिल्ली येथील नाजाफसग्रह खोरे, मथुरा, कानपूर, वडोदरा शहरांचा समावेश
* ३८ औद्योगिक क्षेत्रांचा ‘गंभीर प्रदूषित क्षेत्रात’ समावेश. ३० औद्योगिक क्षेत्र हे तीव्र प्रदूषित क्षेत्र
* राज्यातील चंद्रपूर क्षेत्र २७ व्या क्रमांकावर आहे. औरंगाबाद (३९), डोंबिवली (४०), नाशिक (४१), नवी मुंबई (५१), चेंबूर औद्योगिक क्षेत्र (८०), पिंपरी-चिंचवड (८६), तर महाड ९२ क्रमांकावर आहे.
Source: Link
Media: Link