बीड जिल्ह्यातील तरुण शेतकरी नामदेव आणेराव शेती करता करता उद्योजक झाला. शेती करत असताना शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांना पर्याय म्हणून समजदार श्रीकांत या नावाचे एक बहुउद्देशीय यंत्र तयार केले आणि आता या यंत्रनिर्मितीचा कारखाना उभारला आहे. कारखाना उभारण्यात त्यांना सीएमआयए – मॅजिकचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.15 मे रोजी समजदार अॅग्रो इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कारखान्याचे उद्घाटन सुनील रायठ्ठा आणि प्रसाद कोकीळ यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाले.
2016 पूर्वी बहुउद्देशीय कृषी यंत्रांचे नामदेव यांनी संशोधन केले आणि 2016 मध्ये त्यांनी या यंत्राची निर्मिती करून त्याचा पहिल्यांदा वापर केला. प्रयोगात्मक वापराच्या वेळी आढळून येत गेलेल्या त्रुटी दूर करीत करीत आता त्यांनी अंतिम यंत्र तयार केले व त्याचे उत्पादनही हाती घेतले. त्यांच्या संशोधनाकडे मराठवाडा एक्सलेटर फोर ग्रोथ एंड इंक्युबॅशन कौन्सिल मॅजिक (मॅजिक)चे लक्ष गेले. त्यांनी त्याला सर्व प्रकारचे सहकार्य करीत पाठिंबा दिला. सीएमआयए- मॅजिकच्या अंतर्गत कारखाना उभारण्यासाठी सीडफंड म्हणून नामदेव आणेराव यांना मॅजिकतर्पेâ सुरुवातीला एक लाख रुपये दिले. याव्यतिरिक्त मॅजिकने त्याला समजदार श्रीकांत या यंत्राचे पेटंट मिळवण्यासाठीही मदत केली. या पेटंट मिळण्याच्या प्रक्रियेदरम्यान कंपनी स्थापनेसाठीही मॅजिकने मदत केली.
दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर नामदेव आणेराव यांनी यानंतर बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे या कारखान्याची उभारणी केली. हा कारखाना नऊ हजार स्क्वेअर फूट एवढ्या विस्तीर्ण परिसरात उभारला आहे. या कारखान्याद्वारे त्याने गावातील होतकरू बेरोजगार तरुणांना गावातच रोजगार देऊन एक वेगळा पायंडा पाडला आहे. नामदेव आणेराव यांना विनोदराय इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर सुनील रायठ्ठा, संजय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रसाद कोकीळ, सीएमआयएचे माजी अध्यक्ष आणि मॅजिकचे संचालक आशिष गर्दे, यशश्री प्रेस प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर मिलिंद कंक, सीएमआयएचे माजी अध्यक्ष मुनीष शर्मा यांनी मोलाचे सहकार्य करत शेतकरी ते उद्योजक हा प्रवास घडवण्यास मदत केली आहे. उद्घाटनप्रसंगी नामदेव आणेराव यांनी आपल्याला सर्वतोपरी मदत केल्याबद्दल सीएमआयए, मॅजिक आणि विविध उद्योजकांचे आभार मानले.
कारखान्यात तयार होणारे यंत्र शेतकऱ्यांसाठी पूरक व बहुउद्देशीय आहे. आज या कारखान्यात पंधरा मशीनची निर्मिती झाली असून, ती सर्व विकली गेली आहेत. याशिवाय 25 मशीनची नोंदणी झाली असून त्यांचीही लवकरच निर्मिती होऊन त्याही विकण्यात येणार असल्याची माहिती नामदेव यांनी दिली.
मशीन आहे तरी काय?
सीएमआयएच्या सल्लागारांच्या मार्गदर्शनाआधारे तयार करण्यात आलेल्या समजदार श्रीकांत हे यंत्र विकसित करण्यात आले. या मशीनद्वारे विविध प्रकारची कामे होतात. या मशिनची किंमत 56 हजार रुपये असून याला तीन अटॅचमेंट आहेत. यंत्रासाठी असलेल्या तीन अटॅचमेंटमुळे बहुउद्देशीय कृषी कामासाठी वापरले जाऊ शकते. जसे की गवत कापणी, पेरणी, पेरणीनंतर बियाणे आणि जमिनीत खते घालणे यांचा समावेश आहे.
Source: Link
0 Comments