धुळ्यातील दोंडाईचाच्या कलिंगडांना कतारमध्ये मोठी मागणी आहे. भारतीय बाजारपेठांपेक्षा दोंडाईचाच्या कलिंगडांना दुप्पट भाव मिळतो. भारतातील ठोक बाजारात कलिंगडाला 7 ते 8 रुपये प्रति किलो दर मिळतो, तर हाच दर कतारमध्ये सर्व खर्च वजा जाता 15 ते 20 रुपये मिळतो.
दोंडाईचा येथील प्रगतिशील शेतकरी आणि उद्योजक सकार रावल यांनी दुष्काळावर मात करीत मोठ्या प्रमाणावर कलिंगडांचे उत्पादन घेतले. त्यांनी 35 एकर जागेत तब्बल 144 टन इतके कलिंगडांचे उत्पादन घेतले. कलिंगडांनी भरलेले सहा कंटेनर भरून त्यांनी कतारला निर्यात केले. कमी पाण्यात जास्त उत्पन्न कसे घेता येईल, याबाबत ते प्रयत्न करीत आहेत. ते 65 वर्षांचे असून गेल्या वर्षी त्यांनी 5 टन लिंबू निर्यात केले होते.
कलिंगडाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये –

कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीत, कमी खर्चात, जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे वेल वर्गातले पीक आहे. त्याला उन्हाळ्यात भरपूर मागणी असते. कलिंगड हे आरोग्यवर्धक आहे. कलिंगडाच्या सुकलेल्या बिया या आयुर्वेदिकदृष्ट्या गुणकारी आणि पौष्टिक असतात. त्यामुळे शेतकरी आता उच्च तंत्रज्ञानाच्या आधारे बाराही महिने हे पीक घेऊ लागलेत.

असे घेतात कलिंगडाचे पीक –

पूर्वी कलिंगडाचे पीक फक्त नदीपात्रातील वाळूमिश्रित जमिनीत घेतले जात होते, मात्र अलीकडे सेंद्रिययुक्त जमिनीत हे पीक उत्तमरीत्या घेता येते. कलिंगडाच्या पिकाला 22 ते 25 अंश तापमान उपयुक्त असून भरपूर सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान मानवते.

कलिंगडाच्या जाती-

कलिंगडाच्या अधिक उत्पादन देणार्‍या आणि संकरीत अशा अनेक जाती आहेत. त्यातली शुगरबेबी ही 2-2 किलो वजनाची फळं देणारी, अतिशय गोड, लाल आणि बारीक बियांची 11 ते 13 टक्के साखर उतारा असणारी जात आहे. फक्त 75 ते 80 दिवसात ही फळं तयार होतात. अरका माणिक ही लंब वर्तुळाकार पांढरे पट्टे असणारी 5 ते 6 किलो वजनाची फळं देणारी आणि 12 ते 15 टक्के साखर असणारी जात आहे. असाही यामोटो ही जपानी जात 4 ते 7 किलो वजनाची फळं देणारी, बारीक बियांची उत्पादनक्षम अशी जात आहे.

Source: Link

Media: Link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *