प्रसिद्ध लावणीकलावंत राजश्री काळे-नगरकर यांचा मुलगा अमित काळे नुकतीच युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाला.

लावणीसम्राज्ञी राजश्री काळे-नगरकर यांचा चिरंजीव अमित काळे हा २०१८ च्या यु.पी.एस.सी. परीक्षेत २१२ व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला असून लवकरच आय.ए.एस. अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रूजू होईल. केवळ राजश्री यांच्यासाठी नाही तर महाराष्ट्रातील तमाम लोककलावंतांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात लोककलावंत दूरदृष्टी ठेवून आपल्या मुलाबाळांचे उज्ज्वल भवितव्य घडवित आहेत, ही अतिशय आनंदाची बाब आहे. राजश्री काळे-नगरकर यांचा कलाक्षेत्रातील प्रवास हा अतिशय थक्क करणारा आणि त्यांनाच स्वप्नवत वाटणारा असा आहे. अलीकडेच झी मराठी वाहिनीच्या ‘उंच माझा झोका’ या कार्यक्रमात त्यांना गौरवण्यात आलं, त्यांचा सत्कार करण्यात आला; तो केवळ त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल नाही, तर कलेची सेवा करताना एक आदर्श माता म्हणून त्यांनी घालून दिलेल्या वस्तुपाठाबद्दल त्यांचा हा सन्मान होता. अमित काळे सद्यस्थितीत इंडियन डिफेन्स इस्टेट्स सर्विस या संरक्षण दलाच्या विभागात असिस्टंट कमांडंट या पदावर कार्यरत आहे. सन २०१७ च्या यु.पी.एस.सी.च्या परीक्षेनुसार त्याला ८१२ वा क्रमांक प्राप्त झाला होता, त्यानंतर त्याने अपग्रेडेशनसाठी २०१८ साली पुन्हा यु.पी.एस.सी.ची परीक्षा दिली आणि अलिकडेच लागलेल्या निकालात २१२ व्या क्रमांकावर झेप घेतली, हे निश्चितच कौतुकास्पद आहे आणि अभिमानास्पदही!

एकेकाळी महिला लोककलावंतांचे जीवन अतिशय खडतर असे. ‘पायात चाळ पोटी भुकेचा काळ। तंबू राहुटीत माय न् बाळ’ अशी त्यांची अवस्था असे. पण या स्थितीतून लोककलावंत बाहेर येत आहेत. ते प्रगतीसाठी नवे पर्याय शोधत आहेत. त्यासाठी अपार कष्ट सोसण्याची जिद्द या लोककलावंतांमध्ये आणि त्यांच्या मुलाबाळांमध्ये दिसते आहे. राजश्री काळे-नगरकर यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आपल्या मुलाला उच्चशिक्षित केले आहे. ‘घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी’ ही उक्ती सार्थ करीत त्यांनी अमितच्या शिक्षणाकडे लक्ष दिले.

कोल्हापूरचे प्रख्यात तालवाद्यसम्राट, कथकनर्तक बाबासाहेब मिरजकर यांच्या गुरुकुलात वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी राजश्री यांनी कथकचे आणि लावणीनृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. आपली आई कलाबाई हिच्याकडून लोककलेचा वारसा घेतला. मुंबईकरांना राजश्री काळे-नगरकर यांच्या कलेचा पहिला परिचय झाला तो, ‘कालनिर्णय सन्मान संध्या’ या कार्यक्रमातून. या कार्यक्रमात ‘पंचबाई मुसाफिर अलबेला’ ही लावणी सादर करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. घोड्यांचा टापांचा आवाज, घुंगराच्या बोलातून त्यांनी काढला होता. ‘स्नेह तुशी केला’ या दुसऱ्या लावणीत विटू-दांडूचा खेळ त्यांनी लावणीतून रंगविला. सुधीर दामले यांच्या ‘नाट्यदर्पण’ संस्थेद्वारे देण्यात येणारा अतिशय मानाचा ‘महिंद्र नटराज पुरस्कार’ त्यांनी प्राप्त केला. यावेळी त्यांच्यासोबत जयमाला शिलेदार यांनादेखील हा पुरस्कार प्राप्त झाला होता. या कार्यक्रमात राजश्री काळे-नगरकर यांची अदाकारी आणि नृत्य पाहून ज्येष्ठ संगीतकार नौशाद म्हणाले होते, ‘कोण म्हणतो, महाराष्ट्र कलेच्या क्षेत्रात मागे आहे, जेथे राजश्रीसारखे कलावंत आहेत तो महाराष्ट्र कलेच्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ राज्य आहे.’ उस्ताद झाकीर हुसेन, पंडित शिवकुमार शर्मा, शंकर महादेवन आदी कलावंतांच्या समोर कला सादर करण्याचे भाग्य राजश्री यांना लाभले आहे. आय.सी.सी.आर.तर्फे रशिया, जपान, इंडोनेशिया, न्यूझीलंड आदी देशात पंचतारांकित लावणी सादर करण्याचा बहुमानही राजश्री यांना प्राप्त झाला आहे. या देशांमध्ये केवळ कलासादरीकरण नव्हे, तर तेथे परदेशी मुलांना प्रशिक्षण देण्याचा मानही राजश्री काळे-नगरकर यांना प्राप्त झाला. त्यांची भगिनी आरती नगरकर, प्रख्यात तालवाद्यवादक पांडुरंग घोटकर, कृष्णा मुसळे त्यांच्यासोबत होते. दादर शिवाजी पार्क येथे आयोजित झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात भागवताचार्य वा. ना. उत्पात यांच्या निवेदनासोबत कलादर्शन घडविण्याचा बहुमानही त्यांना प्राप्त झाला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभागातर्फे आयोजित तमाशा प्रशिक्षण शिबिराचे संचालकपद त्यांनी दोन वेळा भूषविले. ‘बरखा सातारकर’ या चित्रपटासाठी मध्यवर्ती भूमिकेसाठी प्रथम पर्दापण उत्कृष्ट अभिनेत्री असा राज्य चित्रपट पुरस्कारही राजश्री यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे या पुरस्काराच्या वेळी प्रख्यात हिंदी चित्रपट अभिनेत्री तब्बू राजश्रीबरोबर पुरस्काराच्या स्पर्धेत होती. ‘बरखा सातारकर’ चित्रपटाची कथा ही बÚऱ्याच अंशी तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनाशी मिळतीजुळती होती.

कलेच्या क्षेत्रात शिखर सन्मानासोबत यशाचे टप्पे गाठणाऱ्या राजश्री काळे-नगरकर यांनी आदर्श माता म्हणून आपले जीवन घडविले. त्यांचा पुत्र अमित काळे याच्याशी बोलण्याचा योग आला तो म्हणाला, ‘माझे आणि माझ्या आईचे स्वप्न आज पूर्ण झाले. मी पुणे येथील नगरवाला शाळेत ज्युनियर केजीपासून शिक्षण घेतले. नंतर चौथी ते दहावी मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतले. ११वी – १२ वीचे शिक्षण आपटे ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्ण केले आणि विश्वकर्मा इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे मॅकेनिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण घेऊन बी.टेक. झालो आणि सन २०१४ पासून यु.पी.एस.सी.च्या तयारीसाठी दिल्ली गाठली. मला आणि आईला एकदा डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी जिल्हाअधिकारी कार्यालयात नगरला खेटे घालावे लागले. तेथे एक उपजिल्हाअधिकारी अतिशय वेगाने आणि सचोटीने काम करीत होते, ते पाहून आई म्हणाली ‘तू असा कलेक्टर हो, माझे स्वप्न पूर्ण कर.’ आज आईचे स्वप्न मी पूर्ण केले. अभ्यासाशिवाय ट्रेकिंग, फुटबॉल हा माझा आवडीचा छंद आहे. अभ्यासात भूगोलाचा अभ्यास मला अतिशय आवडतो. ऑगस्टमध्ये आय.ए.एस.चे प्रशिक्षण सुरू होणार आहे, त्याचे मला कुतूहल आहे. घरी शिक्षणाची फार मोठी परंपरा नसताना मी या यशापर्यंत पोहचू शकलो, त्याचे सर्व श्रेय माझ्या आईचेच आहे.’

राजश्री काळे-नगरकर म्हणाल्या, ‘मला कलाक्षेत्राने भरपूर यश आणि प्रसिद्धी दिली. मी माझ्या कलेला पंचतारांकित सन्मान प्राप्त करून दिला. अनेक मान्यवर कलावंतांसमोर कला सादर करण्याचा बहुमान प्राप्त झाला. कलेच्या क्षेत्रातील या कलादानासोबत पुत्राने प्राप्त करून दिलेला हा गौरव माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. कारण लहानपणापासून मी त्याला दूर ठेवले, हॉस्टेलला ठेवले. आई म्हणून काळजावर दगड ठेवला. त्याला सुदैवाने एकाकीपण आले नाही. त्याने एकलव्यासारखी साधना केली आणि आज तो आय.ए.एस.पर्यंत पोहोचला. मी समाधानी आहे.’

अनेक लोककलावंतांची मुले आता आपल्या पारंपरिक कलेच्या अवकाशापासून दूर राहून आपले नवे आकाश शोधत आहेत, यशस्वी भरारी घेत आहेत. राजश्री काळे-नगरकर आणि त्यांचा पुत्र अमित काळे यांची ही गगनभरारी म्हणजे वास्तवात उतरलेले स्वप्न होय!

Source: Link