शिवाजी विद्यापीठातून मराठी विषयात गोल्ड मेडल मिळविल्यानंतर प्राध्यापक होण्याची इच्छा, तर दुसरीकडे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करून नवीन कुटुंबात स्थिरावत असताना अचानक वडिलांच्या आजारपणामुळे ट्रान्स्पोर्टेशनसारख्या अवजड व्यवसायात उतरण्याची वेळ जाई देशपांडे यांच्यावर आली. वडिलांचे आजारपण आणि वैवाहिक आयुष्याला सुरवात या परिस्थितीत त्यांना वडिलांचा व्यवसाय बंद करणे सहज शक्‍य होते, मात्र जाई यांनी दोन्ही कुटुंबांना विश्‍वासात घेऊन वडिलांचा व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मागील बारा वर्षांपासून त्या ‘क्विक पार्सल सर्व्हिसेस’ या कंपनीचा ट्रान्स्पोर्टेशन व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहेत आणि त्यात ‘एक्‍स्पान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन’ही आणले आहे!

ट्रान्स्पोर्टेशनसारखा व्यवसाय पुरुषांची मक्तेदारी. या व्यवसायातील कामाचे स्वरूप आणि स्पर्धा अत्यंत टोकाची. ट्रक किंवा टेम्पोसारखी मालवाहतूक करणारी वाहने घेणे, कंपनीत जाऊन काम मिळवणे ही वरवर दिसणारी कामे. त्याचबरोबर काम मिळविताना नफा घेण्याची लवचिकता ठेवणे अतिशय आव्हानात्मक असते. याशिवाय, वाहनांची देखभाल, इंधनाचा खर्च, रस्त्यावर अचानक उद्‌भवणाऱ्या समस्या, वेगवेगळ्या स्वभावाचे वाहनचालक हाताळणे, वेळप्रसंगी माल चढवणे किंवा उतरवून घेणे हे सोपे काम नव्हे. मात्र, वडिलांनी माणसे जोडण्याचा दिलेला कानमंत्र आणि पतीची खंबीर साथ यांमुळे जाई यांनी फक्त नावापुरत्या कंपनीच्या मालक न राहता छोट्या-मोठ्या गोष्टींपासून व्यवसायात प्रत्यक्ष काम करण्याचे कसब मिळवले.

जाई यांच्या व्यवसाय कौशल्याची चुणूक त्यांनी निवडलेल्या ‘मार्गा’वरून सहज लक्षात येते. त्यांचा जन्म साताऱ्यातला. शिक्षण कोल्हापुरातून. सासर पुण्याचे. या सगळ्यात सामान धागा म्हणजे ‘एनएच-४’!  त्यांनी व्यवसायाची सूत्रे हाती घेतली, त्या वेळी पुणे येथून रोड ट्रान्स्पोर्टसाठी लागणारा तुलनेने चांगला रस्ता म्हणजे एनएच-४. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी आपले लक्ष या रस्त्यावर केंद्रित केले आणि एका ट्रकपासून सुरू झालेला प्रवास पाचपर्यंत येऊन पोचला आहे. आज त्या महिंद्रा लॉजिस्टिक, कमिन्स इंडियासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी जोडल्या गेल्या आहेत. त्याशिवाय त्यांनी प्रवासी आणि विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या वाहनसेवा क्षेत्रातही बसवला आहे. थोडा मोठ्या स्वरूपाचा विचार करून लॉजिस्टिक क्षेत्रात भारतासारख्या देशात व्यवसाय किंवा नोकरीच्या असंख्य संधी असून, तरुणांबरोबरच महिलांनीही न घाबरता आणि आत्मविश्वासाने पुढे येण्याचे आवाहन त्या करतात.

व्यवसाय आणि कुटुंब अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी मराठी साहित्याशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही. चांगल्या साहित्याचे वाचन, मासिके किंवा ब्लॉगच्या माध्यमातून लिखाण या माध्यमातून त्यांनी आपली मराठीची आवड जोपासली आहे. त्याचबरोबर, महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषय शिकविणे किंवा अभ्यासासंबंधीचे मार्गदर्शन करण्याचे काम त्या विनामूल्य करीत आहेत.

(शब्दांकन : प्रवीण कुलकर्णी) 

Source: Link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *