बदल स्वीकारला तरच बाजारपेठेत टिकाल; उत्पादनाचा दर्जा चांगला ठेवा

— जालन्याचे उद्योजक सुनील रायथत्ता यांचे प्रतिपादन

धुळे: उद्योजकांनी उत्पादनाला योग्य किंमत मिळेल, अशी बाजारपेठ शोधण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर निर्यातीवर भर द्यावा. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे उत्पादनात बदल करण्याची तयारी ठेवावी. कारण बदल स्वीकारला तरच जागतिक बाजारपेठेत उद्योजक टिकाव धरू शकतील. त्याचबरोबर उत्पादनाचा दर्जा चांगला ठेवावा. ग्राहकांचा विकास संपादन करून जागतिक अर्थकारणाचा हिस्सा होण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन जालना येथील उद्योजक सुनील रायथत्ता यांनी केले.

लघुउद्योग भारतीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त येथील दाते रिजेन्सीमध्ये सोमवारी जिल्हास्तरीय अधिवेशन झाले. त्या वेळी उत्पादन निर्मिती ते अमर्याद संधी याविषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. या वेळी लघुउद्योग भारतीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र वैद्य, राष्ट्रीय महामंत्री गोविंदराव लेले, लघुउद्योग भारतीचे शाखाध्यक्ष सुभाष कांकरिया आदी उपस्थित होते. सुनील रायथत्ता म्हणाले की, उद्योजकांनी देशाचा विकास व आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवत वाटचाल करण्याचा प्रयत्न करावा. भारतात उत्पादीत वस्तू विदेशात विक्री होऊ शकत नाही, अशी काही उद्योजकांची मानसिकता असते. निर्यात धोरणाविषयी अनेक गैरसमज निर्माण झाले आहे. उद्योजकांना देशातील मोठ्या बाजारपेठांसह विदेशात वस्तू निर्यात करण्याची मानसिकता तयार करावी लागेल. जागतिक बाजारपेठेत व्यवसाय विस्तारण्याची मोठी संधी उद्योजकांसमोर आहे. या संधीचे उद्येाजकांनी सोने करावे. चीनमधील लहान उद्योजकही त्याचे उत्पादनात जगभरात विक्री करतो मग भारतातील उद्योजक तसे का करू शकत नाही. भारतात उत्पादीत वस्तू दर्जेदार असल्याने या वस्तूंना विदेशात चांगली मागणी असते. जगातील देशांचा भारतीयांचे उत्पादन कौशल्य व तंत्रज्ञानावर विश्वास आहे. उद्योजकांनी ग्राहकांच्या मागणीप्रमाणे उत्पादनात बदल करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. कारण बदल स्वीकारला तरच उद्योजक जागतिक बाजारपेठेत टिकतील. निर्यात करताना उत्पादनाचा दर्जा चांगला ठेवावा. उद्योजकांनी प्रगतिशील देशापेक्षा अविकसीत व विकसनशील देशात निर्यात करण्यावर भर द्यावा. आफ्रिका खंडात भारतीय मालाला चांगली बाजारपेठ आहे. त्याचप्रमाणे प्रगत राष्ट्रातही उत्पादने विक्री करता येऊ शकतात. त्यासाठी उद्योजकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसाद करण्याची तयारी ठेवावी. त्याचबरोबर बाजारपेठेचा अभ्यास करावा. देश,विदेशात भरणाऱ्या प्रदर्शनाला भेट द्यावी. तसे केल्याने बाजारपेठेचा व बदलत्या तंत्रज्ञानाचा अंदाज येतो. भारतातील उद्योजक २०० देशात त्यांच्या वस्तूनिर्यात करू शकतात इतकी मोठी उपलब्ध आहे. विदेशात काम करताना भाषेची अडचण फारशी येत नाही. कारण उद्योगात प्रॉफीट ही जागतिक भाषा असते, असेही ते म्हणाले. लघुउद्योग भारतीचे राष्ट्रीय महामंत्री गोविंदराव लेले यांनी लघुउद्योग भारतीचे कार्य आणि भूमिका याविषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, लघुउद्योग भारतीच्या देशात सर्वत्र शाखा आहेत. उद्योग हित राष्ट्रीय हित या ब्रीदवाक्यानुसार लघुउद्योग भारतीचे कार्य सुरू असल्याचे ते म्हणाले. लघुउद्योग भारतीचे शाखाध्यक्ष सुभाष कांकरिया यांनी लघुउद्योग भारतीतर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. राजेंद्र जाखडी यांनी सूत्रसंचालन केले.